शेकापसोबत आघाडी करा पण दळवी सोबत जावू नका

स्व. मधुकर ठाकूर यांनी दिला होता सल्ला
माजी जि प सदस्य काका ठाकूर यांचे प्रतिपादन
बोरिस गुंजिस येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात काँग्रेस आणि शेकाप ची आघाडी व्हावी अशी सर्व कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा होती. आणि स्व पप्पा त्यावेळी बोलले होते की,वेळ पडली तर स्वतंत्र लढा वाटल्यास शेतकरी कामगार पक्षासोबत जा पण महेंद्र दळवी सारख्या दुसऱ्या कोणासोबत जायचे नाही असा सल्ला त्यांनी दिला होता अशी माहिती स्व मधुकर ठाकूर यांचे बंधू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र तथा काका ठाकूर यांनी दिली.

बोरिस गूंजीस येथे काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेकपक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, शिवसेनेचे समीर तथा पिंट्या ठाकूर, काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील, तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, वरसोली ग्रां प सदस्य सुरेश घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य रविना ठाकूर, अमीर ठाकूर, राऊत, उमेश ठाकूर, सुरेंद्र कटोर, लडगे, सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना म्हात्रे आदी उपस्थित होते.


काका ठाकूर पुढे म्हणाले की तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी शेकाप सोबतचे जुने मतभेद विसरून जायला हवे. शेकाप आणि काँग्रेस हे समविचारी आहेत. आपल्यात शत्रुत्व करून विरोधक स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम करीत आहे. काँग्रेस समोर शेकाप आपला शत्रू सांगणार आणि शेकाप समोर काँग्रेस आपला शत्रू सांगणार असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे विकासासाठी आपण एकत्र येणे ही काळाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत असून आपला विजय निश्चित आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वांनी बेसावध न राहता विरोधकांना कमी न लेखता कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे. शेकाप जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त विकास करण्याचा सर्वांनी प्रयत्न करू या.


विकासाच्या दृष्टीने एकत्र येवून जे काही मतभेद असतील ते विसरून गेलो पाहिजे असेही ते म्हणाले. काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर म्हणाले की आरे ला कारे करण्याची ताकद आमच्यात आहे. कोण दादागिरी करत असेल तर त्याला कोणी बळी पडू नका असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तालुक्यात चुकीच्या पद्धतीने जे सुरू आहे दादागिरी विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सर्वच नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.

Exit mobile version