जनआशीर्वाद यात्रेचा निषेध प्रकरणी शेकाप नेते निलेश थोरे अटकेत

माणगाव | प्रतिनिधी |
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचा विरोध करणार्‍या शेकाप नेते निलेश थोरे यांना माणगाव येथे पोलिसांनी अटक केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही जनआशीर्वाद यात्रा सोमवारी रायगडात सुरु झाली.या यात्रेच्या विरोधात शेकाप नेेते निलेश थोरे यानी विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
केंद्रातील मोदी सरकारकडून जनसामान्यांची घोर फसवणूक झाल्याने भाजप ने आशीर्वाद मागण्यासाठी नव्हे तर माफी मागण्याकरीता यात्रा काढली पाहिजे असे परखड मत युवा नेते निलेश थोरे यांनी व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे माणगाव मध्ये जनआशीर्वाद यात्रा रोखून संबंधिताना शेकाप तर्फे काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे याआधीच जाहीर केले होते, परंतु रविवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा शेकाप युवानेते निलेश थोरे व कार्यकर्त्यांना माणगाव पोलीस ठाण्यामार्फत अटक करण्यात आली असल्याने माणगाव तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.
एकच चर्चेचा विषय झाला आहे,निषेध करणे हा भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेला अधिकार असुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली केंद्र शासनातर्फे प्रशासनाला हाताशी धरून होत असल्याचा आरोप शेकाप कार्यकर्ते करत आहेत .दरम्यान अटक झाल्यानंतर शेकाप चे कार्यकर्ते व माणगावकर नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर माणगाव पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन तसेच निलेश थोरेंच्या अटकेविरोधात सोशल मीडियावर पोस्ट, स्टेटस ठेऊन आपला निषेध नोंदवला आहे.

Exit mobile version