तटकरेंनीही साधला निशाणा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिंदे गटाचे नेते गेले अनेक महिन्यांपासून रोज नवे भाकीत करताना दिसत आहेत. मात्र ते प्रत्येक भाकीत खोटे ठरत आहेत, याचा प्रत्यय अलिकडेच आ. दळवींच्या भाकीतामुळे अनुभवायला मिळाला. पालकमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आ. भरत गोगावले हे नवरात्रीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी पालकमंत्री होतील, असे छातीठोकपणे मिडीयासमोर भाकीत करणारे अलिबागचे आ. महेंद्र दळवी यांचे शब्द पुन्हा एकदा खोटे ठरले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दळवींबरोबरच आ. गोगावले यांचे देखील हसू होत आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील दळवींनी त्यांच्याच एका कार्यक्रमात भरत गोगावले यांना चावी दिल्याने गोगावले जे बोलले त्यामुळे त्यांना मंत्रीपदापासून दूर केल्याचे बोलले जाते. त्यामुळे दळवी हेच गोगावले यांच्या मंत्रीपदातील अडथळा आहे कि, असा संभ्रम शिंदे गटाच्या गोटात पसरला आहे.
मंत्रिपदावरून आजवर भरत गोगावले फक्त एक विनोदच ठरले आहेत. त्यात कधी अजितदादा, कधी सुनिल तटकरे तर कधी आ. वैभव नाईक यांनी गोगावले यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली नाही. त्यात आपल्या चुकीच्या निर्णयाने स्वतःलाच अडचणीत आणण्याचे काम गोगावले यांनी अनेकवेळा केले आहे.
त्यात त्यांचेच सहकारी मंत्रिपदाचा मुहूर्त जाहीर करून पुन्हा पुन्हा माध्यमांना गोगावलेंवर विनोद करण्याची संधी देत असतात.
पालकमंत्री पदावरून बंड करणारे गोगावले यांना स्वतःलाच मंत्री आणि पालकमंत्री व्हायचे आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा आपणच पालकमंत्री होणार असल्याचे बोलूनही दाखवले आहेच, त्याशिवाय आपल्याला कोणते खाते मिळणार हे देखील त्यांनी ठरवून टाकले आहे . मात्र त्यांना पालकमंत्री तर सोडाच मंत्रिपदही मिळालेले नाही. माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्याचे भुमीपूजन रविवारी (दि.15) संपन्न झाले. या कार्यक्रमात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना त्यांच्या उपस्थितीतच मंत्रिपदावरून कोपरखळ्या मारल्या.
‘मला वाटले भरतशेट जॅकेट घालून येतील’
माणगाव येथील भुमीपूजन सोहळ्यात गोगावले उशिरा आले. हा धागा पकडून ‘उशिरा आले तर आले शर्ट-पँन्ट घालून आले. मला वाटले नवरात्र सुरू झालीय. आता मंत्रिमंडळाचा विस्तार जवळ आलाय, तर भरतशेत जॅकेट घालून येतील,’ असे तटकरे म्हणताच सभागृहात हशा पिकली होती. ‘मी विरोधात असताना तुम्हाला मंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, आजही माझ्या शुभेच्छा आहेत. शेवटी ज्याच्या नशिबात जे आहे, तेच त्याला मिळणार,’ अशी कोपरखळी तटकरेंनी गोगावले यांना लगावली.
दळवींनीच केला करेक्ट कार्यक्रम?
अलिबागचे आ. महेंद्र दळवी यांनी काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पुढील काही तासात गोगावले यांना मंत्रीपद आणि रायगडचे पालकमंत्री पद जाहीर होणार असल्याची चावी त्यांना मारली. त्यामुळे आवेशात आलेल्या गोगावले यांनी थेट एकनाथ शिंदे हे आपल्याच जीवावर मुख्यमंत्री झाले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा पाच ते सहा दिवसांपूर्वी गोगावले हे नवरात्रीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतील, असे भाकीत दळवींनी वर्तविले होते. मात्र पुन्हा एकदा गोगावलेंचे हसू झाले. त्यामुळे दळवींनीच गोगावलेंचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.