लाचखोरी केल्यास चालणार खटला; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसद अथवा विधिमंडळ सभागृहात भाषण करण्यासाठी, मतदान करण्यासाठी आमदार, खासदार लाच घेत असतील, तर त्यांना कायदेशीर खटल्यापासून बचाव करणारा कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी (दि.04) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सभागृहात लाच घेऊन मतदान करणे किंवा भाषण करणे आता खासदार-आमदारांना महागात पडणार आहे. 1998 च्या नरसिंह राव प्रकरणातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बदलला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात लोकप्रतिनिधींना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या पीठाने म्हटलं की, खासदार किंवा आमदार विधिमंडळ किंवा संसदेतील मतदानासाठी लाच घेऊन कारवाईपासून पळ काढू शकणार नाहीत. घुसखोरीवर लोकप्रतिनिधींना कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. त्यामुळे आता लाच घेणार्या नेत्यांवर कायदेशीर खटला चालवला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मोठा निर्णय देत पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. या खंडपीठात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश, न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा, न्यायमूर्ती जे.पी. पारदीवाला, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश होता.
1998 मध्ये पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 3:2 च्या बहुमताने निर्णय दिला होता. त्यात म्हटले होते की, आमदार, खासदारांनी ‘नोट’ घेऊन भाषण केले तर लोकप्रतिनिधींवर कारवाई करता येणार नाही. मात्र, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आता खासदार किंवा आमदारांना सभागृहात मतदानासाठी किंवा भाषण करण्यासाठी पैसे घेतले तर खटला चालणार आहे. सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे.
काय म्हटले न्यायालयाने विधिमंडळाच्या सदस्याने केलेला भ्रष्टाचार किंवा लाचखोरीमुळे सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकता संपेल. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही वादाच्या सर्व पैलूंवर स्वतंत्र निर्णय घेतले आहेत. खासदारांना यातून सूट द्यावी का? आम्ही याला असहमत आहोत आणि बहुमताने हा निर्णय नाकारत आहोत. कलम 105 अंतर्गत लाचखोरीला सूट नाही. यापूर्वी दिलेला न्यायालयाचा निर्णय कलम 105(2) आणि 194 च्या विरुद्ध आहे. त्यामुळे पी नरसिंह राव प्रकरणातील निकाल आम्ही फेटाळला आहोत.
केंद्र सरकारची भूमिका काय? खंडपीठाने 1998 मधील झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणात पुनर्विचार याचिकेवर मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावेळी केंद्र सरकारने नोट घेऊन मतदान करण्याचा विशेषाधिकारास विरोध केला होता. कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती.