उरण तहसील कार्यालयात गळती

पाय घसरून दुखापत होण्याची भीती

। उरण । वार्ताहर ।

उरण तहसील कार्यालयातील आरसीसी स्लबला पाण्याची गळती लागल्याने सध्या पावसाळ्यात कार्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थी, नागरिक व शेतकर्‍यांवर जलाभिषेक होत आहे. त्यामुळे लाद्यावर साचून राहणार्‍या पाण्यात पाय घसरून दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी, उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी जातीने लक्ष घालून दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उरणला आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

उरण तहसील कार्यालयात दररोज अनेक विद्यार्थी, नागरिक, शेतकरी हे आपली महसूल संबंधित तसेच शासकीय कामे करण्यासाठी ये-जा करीत आहेत. मात्र, अशा विद्यार्थ्यांना, नागरिकांना, शेतकर्‍यांना कार्यालयातील अनेक नागरी सुविधांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून उरण तहसील कार्यालयाला पावसाळ्यात लागलेल्या गळतीची ही समस्या गंभीर बनली होती. यासंदर्भात तसेच कार्यालयातील नागरी सुविधांसंदर्भात अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता. मात्र, संबंधित प्रशासनाने तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याचे बाकडे यांची योग्य प्रकारे सांगड न घालता, फक्त लाखो रुपये खर्चून इमारतीच्या छतावर नियोजनशून्य कारभारातून पत्र्याची शेड तयार केली. त्यामुळे याही वर्षीच्या पावसाळ्यात तहसील कार्यालयातील आरसीसी स्लॅबला पाण्याची गळती लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत, लाद्यावर साचून राहणार्‍या पाण्यात पाय घसरून एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी जातीने लक्ष घालून तातडीने दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version