जामरुख पाझर तलावाला गळती; स्थानिकांच्या मनात भीती

गळती रोखण्याचे प्रयत्न असफल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील जामरुख (सोलनपाडा) येथे असलेला जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचा पाझर तलावाला गळती लागली आहे. तलावाच्या बांधामधून होणारी गळती रोखण्यासाठी केले जात असलेले दुरुस्तीचे काम फेल गेले असून, पाझर तलाव फुटण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ यांच्यात असल्याने परिसरात या पाणीगळतीने भीतीचे वातावरण पसरले आहे.



1980 मध्ये रायगड जिल्हा परिषदेने जामरुख भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सोलन पाडा येथे पाझर तलाव बांधला. त्यानंतर 2009मध्ये डोंगरपाडा येथील पाथरज पाझर तलाव फुटल्यानंतर सोलनपाडा, जामरुख तसेच परिसरातील दहा गावांमधील ग्रामस्थांनी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे आणि तत्कालीन आमदार सुरेश लाड यांची डोंगर पाडा येथे भेट घेतली होती. त्यानंतर जामरुख पाझर तलाव दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून जामरुख पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे स्थानिक समाधानी होते, मात्र पाझर तलावाच्या बांधामधून पाण्याची गळती सुरूच होती आणि त्यामुळे ग्रामस्थ पावसाळा आला आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला की पाण्याच्या गळतीमुळे कधीही धरण फुटून दुर्घटना होऊ शकते, या भीतीने पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थ रात्रीचे झोपत नाहीत. मागील आठवड्यात सतत पाऊस सुरू असून, इर्शाळवाडी येथील दुर्घटना ताजी असताना ग्रामस्थांच्या मनात पुन्हा भीती पसरली आहे.

सोलनपाडा पाझर तलावाची खाली असलेल्या गावातील रहिवाशी अशोक थरकुडे, नितेश कडलक, भावेश थरकुडे, रंजित बांगर, करण सावंत, निखिल बांगर, रुपेश बांगर यांनी भर पावसात पाझर तलावाची पाहणी केली आणि त्यांना धक्का बसला. धरणाच्या मुख्य बांधामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. पाण्याचे कालव्यासारखे लहान लोट मुख्य बांधामधून खाली येत असल्याने ती पाण्याची गळती धोकादायक ठरू शकते हे लक्षात घेवून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाला याबाबत कळविले. शाखा अभियंता सुजित धनगर, गावित यांनी पाझर तलावावर येवून पाझर तलावाच्या मुख्य बांधाची पाहणी केली. धरणाचे बांधकाम नव्याने केले जात असताना पाण्याची गळती रोखण्याचे सर्व उपाय पाटबंधारे विभागाने केले होते आणि तरीदेखील पाण्याची गळती सुरूच आहे याबद्दल संताप स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

साडे तीन कोटींचा निधी गेला फुकट
जलसंपदा विभागाकडून गळती रोखण्यासाठी साडे तीन रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या निधीमधून पाझर तलावाच्या मुख्य बांधावर ड्रिल करून वाळू टाकली जात आहे. त्या वाळूमुळे पाझर तलावामधील गळती रोखली जाईल असा विश्वास जलसंपदा विभागाला आहे. मात्र, ज्या भागात गेल्या चार महिने काम सुरू आहे, त्या भागातदेखील पाण्याची गळती सुरू आहे, त्यामुळे केली जात असलेली दुरुस्तीची काम शासनाचा निधी लाटण्यासाठी आहेत काय, असा सवाल स्थानिक ग्रामस्थ अशोक थरकुडे यांनी उपस्थित केला आहे.

गळती रोखण्याचे काम मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमधून सुरू असून, आम्ही पाण्याची गळती सुरू असल्याची माहिती मिळताच तत्काळ रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना कळविले आहे.

सुजित धनगर, शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version