ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथील जामरुंग पाझर तलाव गुरुवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. मात्र, तलावाच्या मुख्य बांधामधून सुरू असलेली पाण्याची गळती लक्षात घेता ग्रामस्थांमध्ये भीती वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तलावाची पाहणी केली असून, तलावातून होत असलेली गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
सोलनपाडा येथील जामरुंग येथे असलेल्या पाझर तलावाच्या खाली सोलनपाडा गाव असून, आणखी पुढे जामरुंग गाव आहे. या पाझर तलावाची निर्मिती झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल दोनवेळा पाझर तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी किमान 10 कोटी खर्च करण्यात आले आहेत. आज मागील काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलनपाडा येथील जामरुंग पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी तलावाच्या भिंतीची पाहणी केली असता धरणाच्या बांधामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मात्र यावर्षी धरणांमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी मोठया प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील पाण्याची गळती सुरू असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पाणी गळती मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून जात धरणाच्या खाली लोकवस्ती असलेल्या दोन्ही गावातील रहिवाशी यांच्या मनात भीती वाढली आहे. धरण फुटले आणि रात्रीची वेळ असेल तर अनर्थ होईल या भीतीने स्थानिकांनी धरणाची पाहणी केल्यानंतर पाण्याची गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत चे माजी उप सरपंच आणि स्थानिक रहिवशी संदेश सावंत यांनी आपल्या गावातील अन्य ग्रामस्थ यांच्यासह तलावाची पाहणी केली आणि त्यानंतर ही मागणी केली आहे. पाझर तलावाची निर्मिती झाल्यानंतर मागील दहा वर्षात दहा कोटींचा निधी धरणाच्या दुरुस्ती साठी आणि पाणी गळती रोखण्यासाठी खर्च झाले आहेत आणि तरी देखील पाण्याची गळती सुरू असल्याने ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली आहे.