सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण
| मुंबई | प्रतिनिधी |
क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांचे स्वत:चे असे काही फटके आहेत, ज्यांचे नाव त्या-त्या फलंदाजाशी कायम जोडले जाते. असाच एक ‘सुपला शॉट’ या फटक्याला सूर्यकुमार यादवच्या नावाशी जोडले गेले आहे. सूर्यकुमारने त्याच्या या विशेष फटक्याची गोष्टही सांगितली. ‘लहानपणी टेनिस चेंडूने क्रिकेट खेळताना हा फटका मारण्यास शिकलो,’ असे सूर्याने म्हटले. एका कार्यक्रमात सूर्यकुमारने या फटक्याची माहिती सांगितली.
तो म्हणाला की, ‘मला वाटते की, या फटक्याचे नाव मुंबईतील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटवरून आले आहे. मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा फटका मारण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी या फटक्याशी माझं नाव जोडले आणि त्याला एक नाव दिले. जेव्हा हा फटका खेळला जातो आणि त्याला ‘सुपला शॉट’ असे म्हटले जाते आणि हे ऐकायला चांगले वाटते.’ सूर्याने पुढे म्हटले की, या फटक्याची गोष्ट मजेशीर आहे. मी शाळेतील मित्रांसोबत सिमेंटच्या खेळपट्टीवर क्रिकेट खेळायचो आणि ऑफसाइडला 20 मीटरची सीमारेषा, तर उजवीकडे 90-100 मीटरची सीमारेषा होती. आम्ही पावसाळ्यात रबरी चेंडूने खेळायचो आणि चेंडू टाकण्यापूर्वी तो ओला करायचो. गोलंदाज गुडघ्यापासून डोक्यापर्यंत चेंडूचा मारा करत, त्यामुळे चेंडूचा मार सहन न करता धावा हव्या असतील, तर हा फटका मारता आलाच पाहिजे. हा फटका मी रबरी चेंडूने इतक्या वेळा खेळलोय की, आता हा फटका माझ्याकडून आपसूकच मारला जातो.’