गॅरंटी सोडा, आश्‍वासनांचे बोला? – सचिन अहिर

| पनवेल | प्रतिनिधी |

जे लोक आज विकासाची गॅरंटी देत आहेत, त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये जी आश्‍वासने दिली, त्यांचे काय झाले, असा टोला शिवसेनेचे उपनेते तथा मावळ लोकसभा मतदारासंघाचे समन्वयक माजी आ. सचिन अहिर यांनी भाजपला लगावला. आजपर्यंत शिवसेनेने ज्या ज्या लोकांना मोठे केले, तेच आपल्या सोडून गेलेत. त्यांना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील नढाळ या ठिकाणी मेळावा पार पडला. यावेळी अहिर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्याला सचिन अहिर यांच्यासह माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, प्रीतम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे, उल्हासराव देशमुख, नितीन सावंत, सुवर्णा जोशी आदी मान्यवर तसेच कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणमधील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकामध्ये शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी सांगितले की, आपल्याला संजोग वाघेरे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची असून, त्यांना कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरण या पट्ट्यातून आघाडी द्यायची आहे. याप्रसंगी माजी आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले की, संजय वाघेरे हे निवडून येण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊया आणि त्यांना लोकसभेत पाठवूया. ते पुढे म्हणाले, जे कालपर्यंत भाजपवर टीका करत होते, आज तेच मंत्रीपदावर आहेत, असे चित्र पहावयास मिळत आहे. आता कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणच्या आमदारांना जनतेशी काहीही घेणं देणं नाही, अशा आविर्भावात ते वागत आहेत.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजोग वाघेरे यांनी सांगितले, येणारी निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे, वन नॅशन वन इलेक्शन ही संकल्पना भाजपची आहे. मी गेली 32 वर्षे राजकारणात असून, अनेक चढ-उतार पाहिले आहेत, परंतु मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीवरच राहणार. माझ्या डोक्यात सत्तेची हवा कधीच गेली नाही आणि जाणार नाही, मी देशाच्या राजकारणावर न बोलता पनवेलमधील नैना प्रकल्प, मालमत्ता कर जे गेल्या दहा वर्षात सुटले नाहीत, ते सोडवण्याला प्रथम प्राधान्य देईन, उरण विधानसभा क्षेत्रातील आदिवासी पाड्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य देईन.

Exit mobile version