चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी सोडा; शेकापची मागणी

मेमू ट्रेनमुळे रायगडवासीयांचे हाल

। रोहा । प्रतिनिधी ।

दोन दिवसांपासून दिवा-रोहा या मध्य रेल्वेच्या मार्गावर चालणारी मेमू ट्रेन आता चिपळूण स्थानकापर्यंत सुरू करण्यात आली आहे. गौरी-गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर ही ट्रेन चिपळूणपर्यंत जाणार असली तरी यामुळे रायगडमधील जनतेचे हाल होणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेने चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू गाडी सुरु करावी, अशी मागणी शेकापच्या वतीने तालुका चिटणीस राजेश सानप यांनी केली आहे.

गणेशोत्सव काळात दिवा- रोहा या मेमू ट्रेनला रायगडमधील जनतेची सर्वाधिक पसंती असते. या काळात दिवा ते रोहा या सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. पण हीच गाडी चिपळूणपर्यंत जाऊन परत येणार असल्याने रायगडमधील जनतेला गाडीत बसणे सोडा तर गाडीत चढण्यासाठी देखील जागा मिळणार नसल्याने गणेशोत्सव काळात हाल होणार आहेत.

या गाडीला इंदापूर, गोरेगाव रोड आणि वीर या जिल्ह्यातील स्थानकांवर थांबे नाहीत. त्यामुळे गोरेगाव, लोणेरे, महाड, इंदापूर, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या भागातील जनतेला या गाडीचा कोणताही फायदा होणार नाही. तरी चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू चालविण्यात यावी. तसेच त्या गाडीला कोलाड स्थानकापासून चिपळूणपर्यंत असणार्‍या सर्व स्थानकांवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी सानप यांनी केली आहे. या मागणीला रायगड व रोहा तालुक्यातील जनतेने पाठींबा दिला आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Exit mobile version