कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबीर उत्साहात

माणगाव | वार्ताहर |
माणगावमधील एस.एस. निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज माणगाव येथे गुरुवारी विधी सेवा समिती माणगाव व वकील संघटना माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माणगाव विधी सेवा समिती प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा विधी सेवा समिती रायगड अलिबाग यांनी दिलेल्या आदेशान्वये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा न्यायाधीश माणगाव न्या. एन.एस. कोले यांनी दिवाणी व फौजदारी कायदेविषयक स्वरूप स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अ‍ॅड. विनोद घायाळ यांनी इंटरनेट हाताळताना कोणती काळजी घ्यावी, त्याचे दुष्परिणाम काय? तसेच अल्पवयीन विद्यार्थ्याने विनापरवाना गाडी चालविण्यास कोणती परिस्थिती उद्भवू शकते याची जागृती विद्यार्थ्यांमध्ये केली. अ‍ॅड. संस्कृती शिंदे, अ‍ॅड. चंद्रशेखर माणके तसेच अ‍ॅड. यशवंत साधू यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता.
या शिबिराचा प्रारंभ कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे न्या. एन.एस.कोले (विधी सेवा समिती माणगाव अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश माणगाव), माणगाव वकील संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन मेथा व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आला. या शिबिराची सुरुवात माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम.एस. निकम, शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. प्रकाश ओक, सहसचिव विक्रांत सप्रे, सदस्य अ‍ॅड. राहुल ओक यांच्या उपस्थितीत झाली.
शाळेच्या प्राचार्य संगीता कोकाटे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.शाळेचे कॉ ऑर्डीनेटर विजय पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वीपणे पार पडले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी जाधव यांनी केले.

Exit mobile version