| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत येथील के.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती कर्जत व कर्जत विधी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश ए.एस. वाडकर यांचा अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. कैलास मोरे, अॅड. मनोज क्षीरसागर, अॅड. ज्योत्स्ना घारे-जाधव, अॅड. चंदा गौळकर-खापने, अॅड. तुषार भवारे, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिरुद्ध जोशी, सेक्रेटरी प्रवीण गांगल, खजिनदार मदन परमार, सदस्य श्रीकांत मनोरे, सतीश पिंपरे, पर्यवेक्षक सुनील बोरसे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव प्रवीण गांगल यांनी प्रास्ताविक केले.
या शिबिरात सायबर क्राईम, कॉन्स्टिट्यूशन डे, चिल्ड्रन्स डे, राइट्स ऑफ चिल्ड्रन, नॅशनल एज्युकेशन डे इत्यादी विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईलचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम यासंबंधीदेखील माहिती देण्यात आली. सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये हॅकिंग हा सायबर गुन्हा अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसून येतो. या व अशा अनेक गुन्ह्यांपासून आपल्याला कसे वाचता येईल यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्येक मूल शिकला पाहिजे यासाठी कायद्यात अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. आजचा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा उज्ज्वल देशाचा भावी नागरिक असणार आहे, यासाठी प्रत्येक मुलाने शिकून स्वतःची व देशाची प्रगती करणे गरजेचे आहे. यासाठी कायदा नेहमीच भारतातील प्रत्येक मुलाच्या पाठीशी असणार आहे, असेही त्यांनी या शिबिरात सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.