| अलिबाग | प्रतिनिधी ।
अलिबागमधील ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, जेएसएम कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग, सचिव तेजस्विनी निराळे, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांनी लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत मार्गदर्शन करताना युवांनी सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिक सुधारणा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. बालविवाह आणि लोकसंख्या वाढ टाळण्यासाठी युवांनी स्वतःच्या जाणीवा आणि संवेदनशीलता वृद्धिंगत करण्याची गरज आहे असे आवाहन केले.
कायदेशीर मदत आणि बचाव सल्लागार प्रणालीचे प्रमुख ॲड. चंद्रशेखर कामथे यांनी लोकसंख्या दिन या विषयावर मार्गदर्शन करताना युवांनी सार्वजनिक भान ठेवत, समाज माध्यमांचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. लोकसंख्येची वाढ होत असतानाच बालकांविषयीच्या समस्या कशा गंभीर होत चालल्या आहेत, याविषयी विश्लेषण केले. कायदेशीर मदत आणि बचाव सल्लागार प्रणालीच्या उप प्रमुख ॲड. मनिषा नागावकर यांनी बालविवाहामुळे समाजात स्त्री आणि जन्माला येणारे मूल यांच्या आरोग्याविषयक समस्या तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा यामधील तरतूदींविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अलिबागमधील सहाय्यक प्रा.देवोदत्त सूर्यवंशी यांनी लोकसंख्येचा विस्फोट, स्थलांतरामुळे मोठ्या शहरातील नैसर्गिक स्त्रोतांवर येणारा ताण, पर्यावरणाची होणारी हानी या विषयावर सखोल माहिती दिली. लोकसंख्येविषयी चर्चा करताना त्यांनी महिला सक्षमिकरणाचे महत्व विशद केले. स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य हे लोकसंख्येच्या विस्फोटापासून जगाला वाचवू शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. लॉ कॉलेजचे प्रा. डॉ. संदिप घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
जे.एस.एम.महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॅा.पी.बी. गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. लॉ. कॉलेजच्या आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा.निलम म्हात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, जे.एस.एम.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, लॉ. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड. नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले. लॉ कॉलेजमधील लिगल एड सेलतर्फे प्रा.चिन्मय राणे, प्रा.पियुषा पाटील, प्रा.कौशिक बोडस, प्रा. सुरज पूरी, जे.एस.एम. महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डी.जी. खंदारे, प्रा. महेंद्र पाटील यांनी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये लॉ कॉलेज डी.एल.एल.ई विभाग, जे.एस.एम. महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डाॅ. निळकंठ शेरे, एन.एस.एस.विभाग तसेच भूगोल विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







