नॅशनल एज्युकेशन डे निमित्त विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न


बालविवाह मुक्त भारतासाठी जनजागृती — शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

|अलिबाग |विशेष प्रतिनिधी |


नॅशनल एज्युकेशन डे निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड – अलिबाग आणि चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विधी साक्षरता आणि जनजागृती कार्यक्रम” चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग येथे पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती बोरे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि विधी साक्षरतेचे महत्त्व सांगितले.

या प्रसंगी असिस्टंट एलईडीसीएस अ‍ॅड. पियुष गडे यांनी “नॅशनल एज्युकेशन डे” चा संदर्भ सांगत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची आणि योगदानाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना “राइट्स ऑफ चिल्ड्रन” म्हणजेच मुलांचे अधिकार, शिक्षणाचे मूल्य आणि त्याचा व्यक्तिमत्त्व विकासावर होणारा परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर डेप्युटी चीफ एलईडीसीएस अ‍ॅड. मनीषा नागावकर यांनी विद्यार्थिनींना पोस्को कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा तसेच महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की मुलींचे विवाहासाठी वय किमान 18 वर्षे आणि मुलांचे 21 वर्षे असावे. तसेच 112 हा टोल-फ्री क्रमांक वापरून पोलिस आणि वैद्यकीय मदत कशी मिळवता येते, तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये तक्रार कशी करावी याची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड तेजस्विनी निराळे या होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “बालविवाह मुक्त भारत” या संकल्पनेवर भर देत बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व विशद केले. बालविवाह घडवून आणणे किंवा प्रोत्साहन देणे हे गुन्हा असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘1098’ या चाइल्डलाइन क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य, नागरिकांसाठी तसेच मुलांसाठी उपलब्ध मोफत कायदेशीर मदत आणि जनजागृती कार्यक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती बोरे यांनी केले. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता वाढते असे नमूद केले.

कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षिका तसेच विद्यार्थिनींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. या विधी साक्षरता उपक्रमातून शिक्षणाचे मूल्य, महिलांचे व मुलांचे हक्क आणि कायद्याची जनजागृती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली.

Exit mobile version