। सोगाव । वार्ताहर ।
मापगांव येथील कनकेश्वर पायथ्याच्या जवळपास असलेल्या शेतकर्याच्या पाळीव म्हैशीच्या दोन रेडकांना वन्य प्राण्याने हल्ला करुन ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा हल्ला बिबट्यानेच केला असावा याबाबत वनविभागाने साशंकता व्यक्त केली आहे.
अजित गोपाळ राऊत यांनी आपल्या शेतातील झाडाखाली नेहमीप्रमाणे जनावरे बांधून ठेवली होती, दुसर्या दिवशी सकाळी शनिवारी (दि.15) पहाटे नेहमीप्रमाणे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतकरी गेले असता जनावरांमधील एक लहान वासरू मृतावस्थेत व हिंस्त्र प्राण्याने खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी त्वरित वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच यातील म्हशीच्या रेडकांवर अज्ञात हिंस्त्र वन्यप्राण्याने दातांने हल्ला करत ठार करून मागील काही भाग खाल्याचे कनकेश्वर वनविभाग परिसराचे वनरक्षक सौरभ पाटील यांनी सांगितले.
हा हल्ला बिबट्यानेच केला असावा याबाबत वनविभागाने साशंकता व्यक्त केली आहे. सदर घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी त्या हिंस्त्र वन्यप्राण्यापासून शेतकर्याला झालेल्या वासराची नुकसान भरपाई देऊन त्या वन्यप्राण्यापासून संरक्षण करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. याबाबत वनविभागाचे वनक्षेत्रपाल नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राउंड स्टाफ तपास करत असल्याचे वनरक्षक सौरभ पाटील यांनी सांगितले आहे.