जर्सी गायीवर बिबट्याचा हल्ला?

| पोलादपूर | प्रतिनिधी |

भोगाव पार्टेवाडीतील शेतकरी तुकाराम रावजी जाधव यांच्या जर्सी गायीवर बिबट्याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिबटयाने हल्ला करून ठार मारलं अथवा कसे याबाबत पशूवैद्यकीय अधिकार्‍यांचा अहवाल मागवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनपाल शाम गुजर यांनी दिली.
जाधव यांची गुरे नेहमीप्रमाणे संध्याकाळी चरायला गेली असता त्यापैकी एक जर्सी गाय गोठयात परत न आल्याने त्यांनी शोधाशोध केली असता सकाळी कातळी बंगला दत्तवाडीतील जंगल भागात गाय मृत आणि अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच वनपाल श्याम गुजर आणि वनरक्षक प्रियंका जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या मृत जर्सी गायीच्या अंगावरील जखमा बिबटयाच्या हल्ल्यामुळे झाल्या आहेत अथवा कसे याबाबत तालुका पशूवैद्यकीय अधिकार्‍यांकडून अहवालही वनविभागाच्या परिमंडळाने मागविला असून त्यानंतरच घटनेमध्ये बिबटयाच्या वावराचा उपद्रव आहे अथवा कसे याबाबतची वस्तुस्थिती उघड होईल, असे वनपाल गुजर यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version