गाय दगावल्याने वनविभागाकडून सावधतेचा इशारा
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील महालगुर मोरेवाडी येथे बिबट्याने गायीवर झडप घालून गायीला भक्ष्य बनविल्याची घटना रविवारी (दि.15) सकाळी उघडकीस आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गाय दगावल्याने वनविभागाच्या पोलादपूर येथील वनपाल बाजीराव पवार यांनी ग्रामीण भागातील जनतेला सावधतेचा इशारा दिला आहे.
महालगुर मोरेवाडी येथील शेतकरी अशोक भाऊ मोरे यांची दुभती गाय शनिवारी घरी परत आली नसल्याने रविवारी सकाळी शोध घेतला असता त्यांना जंगलातील दूर्गम भागात गायीच्या गळ्यावर बिबट्याच्या दाताचे व्रण आणि पोटावर नखांच्या खोल पंजाचे ओरबाडणे दिसून आले. गायीच्या शेपटीकडील भागाचे मांस बिबट्याने फस्त केल्याचे दिसल्याने बिबट्यानेच शिकार केल्याची खात्री पटली. गाय दगावल्याने शेतकऱ्याचे दुधदुभत्याचे नुकसान झाले आहे. बिबट्याने गायीची शिकार केल्यामुळे महालगूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेनंतर बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे होत आहे. या घटनेबाबत अशोक मोरे यांनी वनविभागाला निवेदन दिल्यानंतर वनपाल बाजीराव पवार व वनरक्षक अमोल रोकडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.
महालगूर मोरेवाडीतील शेतकऱ्याच्या गायीची बिबट्याने शिकार केल्याबाबत वनपाल बाजीराव पवार यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करून रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करू नये, हातात काठी व बॅटरी घ्यावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, रात्रीच्या वेळी आजूबाजूला फटाक्यांचा आवाज करावा म्हणजे बिबट्यासारखे हिंस्र प्राणी गाव परिसरात थांबणार नाहीत तसेच गुरांचा वाडा व्यवस्थित बंदिस्त ठेवावा, वाड्याला कुंपण असावे, गुरे रानात मोकळी सोडू नयेत, असे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या वन्यजीव गणनेमध्ये बिबट्याच्या वास्तव्याची लक्षणे व चिन्हे पोलादपूर वनविभागाला दिसली नसताना कोतवाल भागात काहींना बिबट्या निवडणुककाळात भरदिवसा वाहनासमोरून जाताना दिसल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
