बिबट्याचा वनविभागाला गुंगारा; ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ संतप्त
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सकाळची वेळ… नागावकरांची कामाला जाण्याची लगबग… पर्यटनामुळे गजबजलेली कॉटेज्स…दिनक्रम सुरु झालेला असतानाच नागावमध्ये बिबट्या आल्याची चर्चा सुरु झाली. सर्वांच्याच फोनची रिंग वाजू लागली. तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. आणि, संपूर्ण नागावकर रस्त्यावर उतरले. अनेकांनी बिबट्याला बघितल्याची खात्री झाल्यानंतर वनविभाग तसेच पोलिसांना कळविण्यात आले. वनविभागाची टीम आली, त्यांना बिबट्या दिसला. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे बिबट्याने वनविभागाला गुंगारा देत पलायन केले. ही नाट्यमय आणि वन विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणणारी घटना मंगळवारी (दि.9) नागाव वर्तक वाडीजवळ घडली.
नागावमध्ये बिबट्याचा वावर असल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजता घडली. मात्र, त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम रायगड जिल्ह्यात नसल्यामुळे त्यांना पुण्यामधून पाचारण करण्यात आले. सायंकाळी चार वाजता रेस्क्यू टीम नागावमध्ये दाखल झाली. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरही त्यांनी हल्ला केला. जवळपास सहा नागरिकांवर त्याने हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. सुरक्षेसाठी पोलिसांनी अलिबाग-रेवदंडा मार्ग बंद केला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात वनविभाग तसेच पोलिसांना यश आले नाही.
वर्तक वाडी परिसरात बिबट्या सकळापासूनच मुक्तपणे संचार करीत होता. तब्बल पंधरा तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश येईल, असे वाटत असताना सायंकाळी बिबट्याने सुरक्षा भिंतीवरुन जोरदार बाहेर उसळी मारली अन् तो रस्त्यावर आला. अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत जाळी लावण्यात आली होती. मात्र, वनविभागाला गुंगारा देत बिबट्याने पलायन केले.
निष्क्रिय वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर
बिबट्या पकडण्याच्या कार्यात वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा पोलिसांनी जास्त मेहनत घेतल्याचे चित्र दिसून आले. मात्र, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे समोर दिसणारा बिबट्या अलगत निसटून जात होता. सकाळपासून बिबट्याला पकडण्यात निष्क्रिय ठरलेल्या वन विभागाचा कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. वन विभागाने इतरांवर जास्त विसंबून न राहता स्वत:चे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी आणले असते तर बिबट्या सापडला असता. मात्र, ते न केल्यानेच बिबट्या पलायन करण्यात यशस्वी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोधमोहिम सुरू केली. मात्र, यंत्रणा आणि अपुरे कर्मचारी यामुळे शोधमोहिमेत अडथळा येत होता. वनविभागाच्या या कृतीने त्यांनी आपल्या निष्क्रीय कार्यप्रणालीचे प्रथम दर्शन दिले. मात्र, ग्रामस्थांनी बिबट्या घरातच असल्याचा दावा करीत वनविभागाची घिसाडघाई हाणून पाडली. वन विभागाकडे योग्य साधनसामुग्री नव्हती. आणलेले पिंजरेही योग्य ठिकाणी लावले नव्हते. अपुरे मनुष्यबळ आणि अप्रशिक्षित कर्मचारी यांच्यामुळे बिबट्या पळाला.
सात तासांनंतर रेस्क्यू टीम
भरवस्तीत बिबट्या शिरल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला याची खबर दिली. परंतु, बिबट्याला पकडणे वनविभागाच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे लक्षात येताच त्यांनीच पुण्याहून रेस्क्यू टीमला पाचारण केले. परंतु, रेस्क्यू टीमला नागावमध्ये पोहोचण्यास दुपारचे चार वाजले. त्यानंतर त्यांनी बिबट्याला पकडण्याचे काहीसे प्रयत्न केले, परंतु बिबट्या सगळ्यांना गुंगारा देऊन पसार झाला.
ग्रामस्थ आक्रमक, अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची
बिबट्याला पकडण्यासाठी सकाळपासून अत्याधुनिक साधनांविना शर्थीचे प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आले. परंतु, बिबट्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्यामुळे आधीची भीतीच्या छायेखाली असणारे ग्रामस्थ आक्रमक झाले. दरम्यान, सकाळपासून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलीस अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरत आता एकही ग्रामस्थ रस्त्यावर दिसला तर फोडून काढण्याची भाषा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बुधवारी नागाव हद्दीत असणाऱ्या शाळांना सुट्टी देण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात येतील. त्यामुळे मुलांनी घराबाहेर येणे टाळावे. शिक्षकांसह पालकांनीही याची नोंद घ्यावी.
– महारुद्र नाले,
शिक्षणाधिकारी माध्यमिक, राजिप
संबंधित प्रशासनाने त्यांची जबाबदारी वेळीच ओळखून योग्य ती यंत्रणा राबवली असती, तर बिबट्याला जेरबंद करणे शक्य झाले असते. सध्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग, पोलीस, रेक्स्यू टीमची शोधमोहीम सुरू आहे. ग्रामस्थांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे. माझ्यासाठी सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
– हर्षदा मयेकर,
सरपंच, नागाव ग्रामपंचायत
नागाव हे पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. वर्षअखेर असल्यामुळे आता पर्यटकांची संख्या वाढणार आहे. परंतु, वनविभाग बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने आता भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. वनविभागाकडे जाळ्या आणि पिंजऱ्यांशिवाय अत्याधुनिक साधनसामुग्री नाही, याबाबत खेद व्यक्त करावासा वाटतो. बिबट्याला जेरबंद करावे, एवढीच सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
–प्रसाद आठवले,
ग्रामस्थ नागाव







