शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्याच्या पायथ्याशी धोत्रेवाडी आहे. येथील आदिवासी शेतकऱ्याच्या 13 बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर सोमवारी दुपारी वन विभागाचे कर्मचारी पंचनामा करणेसाठी पोहचले.
धोत्रेवाडी येथील मारुती रामजी दरवडा हे शेतकरी उदरनिर्वाहासाठी शेळ्या पालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दुभत्या बकऱ्या आहेत. दरवडा हे त्यातील 14 बकऱ्या मालकीच्या माळरानावर चरण्यासाठी घेवून गेले होते. 19 नोव्हेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास बकऱ्या या जंगलाच्या बाजूला असलेल्या जमिनीवर चारा खात होत्या. त्यातील एक बकरीने एका कोकरुला जन्म दिला. त्यावेळी दरवडा यांनी अन्य बकऱ्या माळरानावरच ठेवल्या आणि जन्म झालेले कोकरु आणि बकरी यांना घेवून घरी गेले. त्यानंतर दरवडा हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा माळरानावर आले. मात्र आपल्या शेतीच्या आजूबाजूला बकऱ्या आढळून आल्या नाहीत. म्हणून ते पुन्हा गावात आले आणि त्यांनी कुटुंबातील अन्य दोघांना सोबत घेवुन पुन्हा जंगलाचा रस्ता धरून बकऱ्या शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्यावेळी सहा बकऱ्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर आणखी सात बकऱ्यांचा शोध घेतला असता त्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी दिसून आल्या. त्यातील एका बकरीवर बिबटा ताव मारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दरवडा आणि त्यांच्यासोबत असलेले शेतकरी घाबरून पुन्हा घरी परतले. 19 नोव्हेंबर रोजी कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ वन अधिकारी यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी वनपाल लांघी हे वन कर्मचाऱ्यांसह पोहचले. मृत झालेल्या 13 बकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी वनपाल यांच्याकडे केली.