वनविभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन
| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील खार आंबोली-शिघ्रे पंचक्रोशीत बिबट्याचा संचार असून या बिबट्याने खार आंबोली येथील एका शेतकऱ्याच्या बकरीवर हल्ला चढवून ठार केले आहे, अशी माहिती मुरूड वनपरिक्षेत्र आधिकारी प्रियांका पाटील यांनी शुक्रवारी बोलताना दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील म्हणाल्या की, ही बिबट्या मादी असून तिच्या बरोबर दोन ते तीन बछडे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. शेत जमिनीवर पडलेल्या विष्ठेवरून बिबट्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खार आंबोली परिसरात या बिबट्याने अचानक हल्ला चढवून ठार केले आहे. सहा वर्षांपूर्वी देखील खार आंबोली भागात बिबट्याचा संचार झाला होता, अशी माहिती शिघ्रे येथील शेतकरी रघुनाथ माळी यांनी दिली. शिघ्रे-खार आंबोली पंचक्रोशीला लागूनच फणसाड वन्यजीव अभयारण्याचा भाग सुरू होतो. बाजूला लागूनच मुरूड केळघर ते रोहा मार्गाचा हा परिसर आहे. त्यावरून रात्री-बेरात्री दुचाकी किंवा चारचाकी वाहनांतुन प्रवासी वाहतूक सुरू असते. या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, छोटी मुले यांनी सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर फिरू नये. बिबट्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांनी केले आहे.