बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील कशेणे गावात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कशेणे गावात मनोज गावाने यांना बिबट्या दिसला होता. परंतु, त्यावर कोणाला विश्वास बसत नव्हता. दि. 29 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कशेणे गावातील गणपत सखाराम शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला. बिबट्याचा वावर गावात असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभाग अधिकारी प्रशांत शिंदे यांना माहिती देण्यात आली असून त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले आहे. तसेच कशेणे गावात बिबट्याचा संचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला असून ग्रामस्थांची याबाबत बैठक घेण्यात आली असून त्याचे समाजप्रबोधन केले आहे. ग्रामस्थांनी रात्री-अपरात्री फिरू नये. मुलांना एकटे बाहेर सोडू नये. धैर्याने, संयमाने उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
