| पेण | प्रतिनिधी |
गेली दोन दिवस पेणमध्ये नंदीमाळ नाक्यावर बिबट्या दिसल्याचा फोटो समाज माध्यमांवर फिरत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. सदरील फोटो कोणी काढला व तो कुणी समाज माध्यमांवर टाकला याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. तसेच घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता, फोटो एडीट केल्याचे आढळून येत आहे. याबाबत पोलीस यंत्रणेकडे चौकशी केली असता त्यांच्याकडूनदेखील ही बाब अफवा असल्याचे समोर येत आहे.
यदाकदाचित काही समाजकंटकांनी पेण शहरात भीतीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून हा फोटो एडिट करून समाज माध्यमांवर टाकला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. तरी, पेणमध्ये बिबट्या आला आहे ही अफवा असल्याचे संबंधित प्रशासनाने सांगितले आहे.
पेणमध्ये बिबट्या आल्याची फक्त आणि फक्त अफवा आहे. बिबट्या पेणमध्ये कुणालाच दिसला नाही. समाज माध्यमांवर उगीचच भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. जर कुणाला खरंच बिबट्या दिसला तर त्यांनी वनक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, लोकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा पोस्ट समाजमाध्यमावर पसरवू नये, असे आवाहन पेण वनक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांनी केले आहे.






