गारमाळ परिसरात बिबट्याची दहशत

मॉर्निंगवाकला येणाऱ्यांचे धाबे दणाणले; वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन

| खोपोली | प्रतिनिधी |

घाटमाथ्यावर असलेल्या गारमाळच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. शनिवारी (दि.21) सकाळी खोपोलीतील दोन जण मॉर्निंगवाकसाठी गारमाळच्या जंगलातील रस्त्याने चालत असताना बिबट्याने त्याच्या पुढ्यात उडी मारल्याने त्यांची धावाधाव सुरु झाली. पळताना त्यातील एक जण पडल्याने जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांचेही धाबे दणाणले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गारमाळच्या परिसरात मोठे आणि घनदाट जंगल असून, येथे अनेक जंगली प्राणी आहेत. त्यातच गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या या परिसरात वावरत आहे. परंतु, तो आता लोकवस्ती जवळ वावरत असून, गारमाळ गावाजवळ मुख्य रस्त्यावरही वावरत असताना अनेक ग्रामस्थांना दिसला आहे. दोन दिवसापूर्वी गारमाळच्या रस्त्यावर चक्क दहा मिनिटे तळ ठोकून बिबट्या बसला होता, त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील ग्रामस्थांच्या गाई-म्हशीची तसेच वासरांचा बिबट्या फडशा पाडत असल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे. या घटनेची वनविभागाने गंभीर दखल घेत ग्रामस्थांनी सतर्क राहून लहान मुलांची, आणि पाळीव जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन खोपोली वनविभागाचे अधिकारी भगवान दळवी यांनी केले आहे.

Exit mobile version