पावलांचे ठसे दिसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावाच्या हद्दीत बिबट्याच्या पावलांचे ठसे उमटले असल्याचे आढळून आले आहे. बुधवार, दि.5 रोजी बाहे गावाच्या हद्दीतील शेतजमिनीच्या भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे उमटले असल्याचे येथील काही नागरिकांना आढळून आले. यामुळे परिसर खळबळ माजली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या पावलांचे ठसे ही बातमी खरी आहे की निव्वळ अफवा आहे, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील जागरूक नागरिकांनी त्वरित वन विभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही पथक बाहे गावाच्या हद्दीतमध्ये आले असता काही प्राण्यांच्या पावलांचे उमटलेले ठसे व बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यामुळे या भागात बिबट्या फिरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
बुधवारी सायं. सहा वाजल्याच्या सुमारास बाहे गावच्या हद्दीत नदीवर पाणी पिण्यासाठी अथवा डुकराचा मागोवा घेण्यासाठी बिबट्या आला असावा. आम्ही पायाचे ठसे तपासले असून, ते बिबट्याचे असल्याचे निदर्शनात आले आहे.
अक्षय लाटे,
वनरक्षक, रोहा
या भागात बिबट्या फिरत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले होते; परंतु याला कोणताही पुरावा नव्हता. परंतु, काल आढळून आलेले ठसे व वनविभाग अधिकारी वर्गाने याबाबत संशोधनात्मिकपणे सिद्ध केल्याने हे वृत्त खरे असल्याने ग्रामस्थांचे म्हणणेही बरोबर असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली आहे.
बाहे ग्रामस्थ
