वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आंबिवली, जिते, कुंभे भागात बिबट्याचे दर्शन अनेकांनी घेतले आहे. त्यात एका बकरीला भक्ष्य केल्याने मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे. वन विभागाने काळजी घेण्याचे आणि रात्री घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली परिसरात बिबट्याने शिरकाव केला असून, एका मेंढराची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ सोमनाथ पालवे हे आपल्या मेंढ्यांच्या कळपासह आंबिवली गावाबाहेर वास्तव्यास आहेत. 21 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्याने एक मेंढरू ठार करून ते ओढत नेले आणि फस्त केले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मेंढपाळ सोमनाथ पालवे यांच्या मेंढरावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
तसेच घटनेची माहिती मिळताच अलिबाग वनविभागाच्या पथकाने आणि स्थानिक वनपालांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी परिसरातील जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्टपणे उमटलेले आढळून आले. यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने अधिकृतपणे मान्य केले आहे. या परिसरात नागरिकांचे वर्दळ असते, हे लक्षात घेऊन वनविभागाने कडक नियमावली जाहीर केली आहे. संबंधित क्षेत्रात कॅम्पिंग करणे, तंबू ठोकणे, रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवणे किंवा पार्ट्या करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बिबट्या मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने ठिकठिकाणी सावधगिरीचे फलक लावले आहेत.
आंबिवली परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. नागरिकांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडणे टाळावे, सोबत बॅटरी ठेवावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
-समीर भुजबळ
वन अधिकारी
