पाच्छापूर परिसरात तीन पिल्लांसह मादीचा वावर
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात रविवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास एक मादी बिबट्या आणि तिची तीन पिल्ले आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पाच्छापूरसह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात माहिती मिळताच तालुका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी रात्री साधारण साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मयूर झोरे हा तरुण कामावरून घरी परतत असताना, पाच्छापूर हद्दीतील ‘जाईचा माळ’ या ठिकाणी त्यांने रस्त्यालगत एका मोठ्या बिबट्यासह तीन छोट्या बछड्यांना प्रत्यक्ष पाहिले. तसेच यावेळी कारमधून जाणारे शेखर राऊत यांच्या कारच्या डॅश कॅमेरा मध्ये सुद्धा हे बिबटे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पाच्छापूरच्या ग्रामस्थांनी तातडीने एकत्र येत वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. पाहणी दरम्यान बिबट्याच्या पाऊलखुणा (पगमार्क्स) आढळून आल्या असून, या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
तालुका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एकटे फिरू नका: रात्रीच्या वेळी किंवा पहाटे एकटे बाहेर पडू नका, शक्यतो समूहाने राहा.
मुलांची सुरक्षा: लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका.
पशुधनाची काळजी: शेतकरी आणि पशुपालकांनी आपली गुरे व वासरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
शौचालयाचा वापर: उघड्यावर शौचास जाणे टाळून शौचालयाचाच वापर करावा. अशा सूचना दिल्या आहेत.
पंचक्रोशीत भीतीचे सावट
बिबट्यांचा हा वावर आता आसानवाडी, पोटलज, धोंडसे आणि वाकलघर या परिसरांकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ पाच्छापूरच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
लोकांनी कृपया घाबरू जाऊ नये. तसेच याबाबत काळजी करण्याची गरज नाही. मात्र सावधगिरी बाळगा. संध्याकाळनंतर किंवा पहाटे एकटे शेतात, जंगलात किंवा बाहेर जाऊ नका. लहान मुले, पाळीव प्राणी आणि जनावरे घरात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. बिबट्याजवळ जाऊन पाठलाग करू नका, त्याला घाबरवू नका किंवा गर्दी करू नका तसेच त्याला पळण्याची जागा द्या. बिबट्याचे दर्शन झाल्यास त्वरित वन विभाग, वनरक्षक किंवा स्थानिक पोलिसांना कळवा (अफवा पसरवू नका). बिबट्या सहसा माणसांना टाळतो आणि फक्त सावध राहिल्यास धोका कमी होतो. सुरक्षित राहा आणि एकमेकांना सावध करा. आवश्यकता असल्यास मदत उपलब्ध आहे.
-विशाल सोनावणे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड – पाली
