वनविभागाकडून मात्र ‘अफवा’ असल्याचे स्पष्टीकरण
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बिबट्याने मानवी वस्तीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आता बिबट्याने आपल्या पंजाची दहशत सुधागड वासियांच्या मनावर ही पसरवायला सुरवात केली आहे.
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बिबट्याचा थरार आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.23) संध्याकाळी म्हशी शोधण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा बिबट्याशी आमनासामना झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाकडून मात्र हल्ला केल्याची ‘अफवा’ असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले आहे. परिणामी वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रश्नी आता सोमवारी (दि. 26) ग्रामस्थ वनविभागाच्या कार्यालयावर धडक देणार आहेत. शनिवारी (दि.24) वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधला मात्र गावकऱ्यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच गावकरी कोणतीही अफवा पसरवत नसल्याचे सांगून प्रत्यक्षदर्शी यांनी आपला अनुभव सांगितला.
पाच्छापूर येथील रहिवासी गणपत बरगे हे शुक्रवारी (दि. 23) संध्याकाळी आपली म्हैस शोधण्यासाठी रानात गेले होते. यावेळी अचानक एक मादी बिबट्या आपल्या पिल्लासह त्यांच्या समोर आली. ही मादी बिबट्या दबक्या पावलाने त्यांच्याकडे येत असल्याचे पाहून बरगे यांनी प्रसंगावधान राखले आणि तातडीने जवळच्या झाडावर चढून आपला जीव वाचवला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला धावून आले, तेव्हा बिबट्या तिथून निघून गेला. “सोबत पिल्लू असल्यामुळे मादी बिबट्या झाडावर चढली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता,” असे बरगे यांनी सांगितले. या घटनेच्या धसक्यामुळे बरगे कुटुंबीयांनी आपली पोल्ट्री सोडून गौळमाळ येथे आपल्या शेजारील गावी जाऊन आश्रय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी येथील असानेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या गाईला बिबट्याने मारले आहे.
ग्रामस्थांचा संताप
या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य उमेश तांबट यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, जोपर्यंत बिबट्या काही उपद्रव करत नाही, तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर वनविभागाकडून मिळाल्याचा दावा तांबट यांनी केला आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच वनविभाग जागा होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न जीवन-मरणाचा असल्याने सोमवारी सर्व नागरिक एकत्रितपणे वनविभागाच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहेत.
बिबट्याने हल्ला केल्याची बातमी चुकीची आहे. बिबट्याचा वावर परिसरात असला तरी त्याने अद्याप कोणत्याही नागरिकावर किंवा प्राण्यावर हल्ला केलेला नाही. काही व्यक्ती खोटी माहिती पसरवून दहशत निर्माण करत आहेत, अशांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. वनविभाग परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून आवश्यक ती खबरदारी घेत आहे.
-विशाल सोनवणे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड-पाली.
