। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील वेश्वी, दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील जंगल परिसरात व कंटेनर यार्ड परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे.यामुळे कामगार व रहिवाशी भयभीत झाले आहेत. कंटेनर यार्ड येथील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी भयभीत झालेल्या रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे.अशा वाढत्या औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड तसेच दगड खाण व्यवसायिक हे मोठ्या प्रमाणात दगड उत्खननासाठी स्फोट घडवित आहेत.त् यामुळे वन प्राण्यांची आश्रयस्थाने संपुष्टात येत आहेत. त्यामुळे भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधार्थ वन प्राणी हे नागरी वस्तीत शिरकाव करत आहेत. हे उरणच्या जनतेने करंजा गावात शिरलेल्या बिबट्याच्या दहशतीतून अनुभवले आहे. वेश्वी, दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील जंगल परिसरात व कंटेनर यार्ड परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून सदर बिबट्या हा कंटेनर यार्ड येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
तसेच काही रहिवाशांनी सदर बिबट्याला जंगल व कंटेनर यार्ड परिसरात वावर करताना पाहिले आहे.त्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे कामगार व रहिवाशी हे भयभीत झाले असून भिंतींच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. कामगार व रहिवाशांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी पोलीस व वन विभागाच्या अधिकार्यांनी सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील यांनी केली आहे. दरम्यान, उरण तालुक्यात किंवा वेश्वी, दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचे दर्शन किंवा वावर आढळून आल्याचे आम्हाला अद्याप समजलेले नाही.मात्र योग्य ती खबरदारी घेतली जाईल. असे उरण वनविभागाचे अधिकारी नतुराम कोकरे यांनी सांगितले.