वडघरमध्ये गायीवर जीवघेणा हल्ला
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून श्रीवर्धन तालुक्यात बिबट्याने अक्षरशः दहशत माजवली असून, प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आता नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आहे. तालुक्यातील वडघर येथे बिबट्याने थेट लोकवस्तीत घुसून एका गायीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.30 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास वडघर येथील शेतकरी बबन सालदुरकर यांच्या गोठ्यात बिबट्याने अचानक झडप घातली. यावेळी बिबट्याने थेट गायीच्या तोंडावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. गायीच्या ओरडण्यामुळे घरातील लोक आणि आजूबाजूचे ग्रामस्थ तात्काळ धावून आले. नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला; मात्र, या हल्ल्यात गायीच्या तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वडघरसह करिवणे, जावेळे, वडशेत वावे, धारवली कोलमांडले आणि मधला वडघर या गावांमध्ये बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही वन विभाग आणि स्थानिक प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. आज गायीवर हल्ला झाला, उद्या एखाद्या माणसाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.






