बँक अधिकार्‍यांना मिळणार धडे; नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती

| पुणे | वार्ताहर |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना आता नागरी सहकारी बँकांमध्ये कार्यप्रशिक्षणाची (इंटर्नशिप) संधी मिळणार आहे. तसेच बँक अधिकार्‍यांसाठी विद्यापीठाने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाणिज्य विभाग आणि पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जी. श्यामला यांच्यासह बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल करंजकर आदी उपस्थित होते.

डॉ. काळकर म्हणाले, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचा अनुभव मिळण्यासाठी विद्यापीठ आणि पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरू होती. आता झालेल्या करारानुसा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नागरी सहकारी बँकेत कार्यप्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच नवीन अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाणार आहे.

नागरी सहकारी बँकाना अनुभवी आणि कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध होण्यासाठी संस्थेने वाणिज्य विभागांशी संपर्क साधला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाअंतर्गत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तयार करण्यासाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. या अभ्यासक्रमाचा बँकेच्या कर्मचार्‍यांसोबतच वाणिज्य विभागांच्या विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे, असे डॉ. गोसावी यांनी नमूद केले.

Exit mobile version