वडवली येथे क्षेत्र भेट; तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कृषी विभगाचा पुढाकार
। दिघी । प्रतिनिधी ।
दिघी-श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे आदिवासी बांधवांना शेती क्षेत्र भेटचे आयोजन करण्यात आले होते. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कातकरी उत्थान अभियान सप्तसूत्री कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रमात आदिवासींना भाजीपाला उत्पादनाबाबत माहिती देण्यात आली.
या भेटीत कुडगाव येथील आदिवासी बांधवांना वडवली येथील उपक्रमशील शेतकरी गणेश कांबळे यांच्या शेतातील विविध भाजी वर्गीय पिकांच्या उत्पादनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. सिद्धेश सावंत, कृषी विभागाचे अधिकारी यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांची यावेळी माहिती देण्यात आली.
सदर क्षेत्र भेटीचे आयोजन श्रीवर्धन महसूल व कृषी विभाग यांच्यामार्फत करण्यात आले. सदर भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी यांनीही आदिवासी बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी सरपंच प्रियांका रुपेश नाक्ती, माजी उपसरपंच दीपक कांबळे, कृषी सहाय्यक पंकज पाटील आदी उपस्थित होते. आदिवासी शेतकरी स्वावलंबी बनावा, त्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी त्यांच्या भाजीपाला द्वारे चांगले उत्पन्न मिळवून देणार्या पीक पद्धती सुचवून त्यांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले.
विविध शिबिरांतून मार्गदर्शन
तालुक्यातील आदिवासी बांधवांना विविध दाखले वाटप, रेशन कार्ड/आधार कार्ड वाटप, आरोग्य तपासणी, रोजगार निर्मिती, कृषी योजनांची माहिती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वनहक्क अधिनियम अंमलबजावणी या सप्तसुत्री अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.