वाहतूक पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
| उरण | वार्ताहर |
न्हावा शेवा वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोरु नारायण म्हात्रे विद्यालय, खारकोपर, उलवे येथे रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (दि.2) करण्यात आले होते. यावेळी छोटा पोलीस मास्करेडचा वापर करून वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
बेशिस्त वाहन चालक, वाढते अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व न्हावा शेवा पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर, पोलीस शिपाई मयूर पाटील व मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक शाखा व विद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले.