समुद्राला तुफान आलं या…

200 हून अधिक होड्या किनारी

मासेमारी ठप्प, मच्छिमारांचे नुकसान

मुरूड जंजिरा | वार्ताहर |
शनिवारी पहाटेपासून अरबी समुद्रात वादळी पावसाचे तुफान सुरू झाले असून, रविवारीदेखील परिस्थिती कायम होती. जोरदार वादळी वारे खोल समुद्राकडून वाहत असल्याने 1 ऑगस्टपासून मासेमारीस गेलेल्या दालदी नेटच्या मोठ्या नौका धोका लक्षात घेऊन सुरक्षितता म्हणून आगरदांडा-दिघी बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली असून, मच्छिमरांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. खोल समुद्रात जाताना प्रत्येक नौकेला किमान दहा लाख रुपये खर्च येतो, अशी माहिती नाखवा (होडी मालक) यांनी दिली.
शुक्रवारी सूर्याभोवती काळ्या वर्तुळाचे कडे निर्माण झाले होते. याचा अर्थ, काही तासात अरबी समुद्रात वादळी वार्‍यासह तुफान येणार, असे भाकीत एकदरा येथील अनुभवी मच्छिमारांनी प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. तुफानाची तीव्रता वाढती आहे. समुद्रात 60 ते 70 वाव पुढे तुफान घोंघावत असून, मुरूड परिसरातील आकाशात काळी छाया दाटून आली आहे. समुद्रकिनारपट्टीवर वादळी वारे जाणवत असून, खोल समुद्रात यांची तीव्रता आधक असते.
तुफानी परिस्थितीत छोट्या अगर मोठ्या दालदी मासेमारी करणार्‍या नौकांसाठी आगरदांडा-दिघी बंदर सुरक्षित खाडी बंदर आहे, अशी माहिती एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी दिली. खोल समुद्रातून मासेमारी अर्ध्यावर सोडून दालदी मासेमारी नौकांची आगरदांडा-दिघी बंदराकडे रीघ लागल्याचे मुरूड, खोरा, राजपुरी येथील जेट्टीवरुन दिसून येत आहे. नौकांची संख्या 200 पेक्षा अधिक आहे, अशी माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छिमार धनंजय गिदी यांनी दिली.
तुफान उठल्याने समुद्रातील स्वरूप पहाटेपासून अक्राळविक्राळ झाले असून, मासेमारी ठप्प झाली आहे. जीवापेक्षा महत्त्वाचे काही नाही, असे अनेक मच्छिमार बोलताना दिसून आले.तुफानाची तीव्रता किती असेल किंवा किती काळ असेल याबाबत निश्‍चित अनुमान काढता येणार नाही. मात्र, किमान आठवडाभर तरी तुफान समुद्रात घोंघावत राहील, अशी शक्यता काही मच्छिमारांनी व्यक्त केली. बोटींची रीघ लागल्याने मुरूडपासून आगरदांडा-दिघी बंदरापर्यंत दहा कि.मी. समुद्रात विद्युत दिव्यांची मोठी साखळीच रात्रीच्या वेळी दिसून येत होती.

Exit mobile version