सांगोला | विशेष प्रतिनिधी |
जेष्ठ नेते गणपतराव देशमुख हे केवळ शेकापचे नव्हते तर सर्व पक्षांमध्ये आदराचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासमवेत विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मला लाभली हे मी माझे भाग्य समजतो. त्याच्या विचारांचा वारसा आम्ही चालविला आहे तोच वसा भावी पिढीनेही चालवावा असे प्रतिपादन माजी. आ. धैर्यशील पाटील यांनी यावेळी केले.
सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत धैर्यशील पाटील बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, आज एका पुण्यभूमीवर आपण जमलो आहोत. आयुष्यभर ज्यांनी निष्ठावंत राहून आजवर कायम लाल बावट्याला साथ दिली आणि आबासाहेबांसारख्या एका ताकदीच्या आणि गोरगरिबांचं कल्याण करणार्या व्यक्तिमत्वाचा ज्यांना सहवास लाभला अशा या सांगोल्याच्या पावनभूमीत सर्वजण आज समोर बसले आहेत.
भाग्यविधाता हा शब्द आपण अनेक बॅनर्सवर बघतो परंतु खरा भाग्यविधाता पाहायचा असेल तर आबासाहेबांचं स्मरण करा. कारण जेव्हा सर्वांना अशक्य वाटत होतं तेव्हा कृष्णा नदीचं पाणी हेसुद्धा आबासाहेबांनी सांगोल्यात आणलं होतं. आबासाहेबांनी फक्त राजकारणच नव्हे तर त्यासोबतच राजकारणाला यशाची जोड कशी द्यावी हे सर्वांना समजावलं. कोणत्याही विधानसभेत बोलत असताना आबासाहेबांचं वाक्य हे ब्रह्मवाक्य समजलं जात होतं. आणि ज्या आबासाहेबांच्या पुण्यभूमीत आपण काम करतोय, ज्या ताकदीनं, ज्या निष्ठेनं आणि ईर्षेने प्रत्येकजण काम करतोय त्यावरून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता एक भविष्यवाणी नक्कीच करू शकतो की, भविष्यात इथला आमदार हा खांद्यावर लाल बावटा घेऊनच विधानसभा निवडणूक लढेल असा मला ठाम विश्वास आहे, असं धैर्यशील पाटील यांनी यावेळी म्हंटलं.