चला मुलांनो, शाळेला जाऊया!

रायगडात उद्यापासून भरणार शाळा
। अलिबाग । वैभव पाटील ।
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु, विद्यार्थी आणि पालकांचा शाळा सुरु करण्याबाबत आग्रह होता. जिल्हह्यातील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन शिक्षणापासून राज्यातील लाखो मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ आदींनी राज्यातील शाळा या कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करून सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. राज्यात ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार 31 जानेवारीपासून सुरू होत आहेत. पुन्हा शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. शाळेमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू होणार. शाळा सुरू होणार हे कळताच मुले, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शाळा भरल्यानंतर होणारे राष्ट्रगीत, प्रार्थना, शिकवताना भरलेले वर्ग या सर्वच गोष्टींची सतत आठवण होऊन शिक्षकांनाही लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात असेच वाटत होते. रोजच्या रोज शाळेत जाण्याची सवय असणार्‍या मुलांना अचानकपणे शाळा बंद झाल्याने घरी करमत नव्हते. शाळा बंद असल्याने घरी अभ्यास करायला मजा येत नव्हती. पालकांना मुलांच्या भवितव्याची चिंतेने ग्रासले होते, त्यांची चिंता आता मिटणार आहे.

अनेकांकडे परिस्थितीअभावी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता. यामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता. गावखेड्यातील विद्यार्थी मोबाईल आणि रेंज नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित होते. परंतु, शाळा सुरु होत असल्याने ही समस्या दूर होत असल्याने समाधान आहे. – विभा पाटील, पालक

शिक्षण प्रक्रियेचा विचार करता अजून बर्‍याच पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत.ज्याच्याकडे आहेत ते पालक रोजगाराला जाताना मोबाईल सोबत घेऊन जातात. विद्यार्थ्यांसाठी सतत आम्ही नवनवीन प्रयत्न करत असतो, शिवाय शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया घडते ती ऑनलाईन शिक्षण प्रणातील घडत नाही. – कृष्णकुमार शेळके, प्राथमिक शिक्षक

गृहपाठ करता येत नव्हता तसेच एखाद्या गोष्टी शंका असेल तर ती प्रत्यक्ष विचारु समाधान होते, ते ऑनलाईन शिकवताना मिळत नव्हते. परंतु, शाळा सुरु होत असल्याने मी आनंदी आहे. – यश घरत, विद्यार्थी

दिवसेंदिवस वाढत असणार्‍या कोरोना रुग्णांमुळे, शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अनेकांकडे मोबाईल नसल्याने, गावखेड्यातील शिक्षण घेणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे, शैक्षणिक नुकसानदेखील होत होते, ते आता थांबणार. – पालक

Exit mobile version