मिशन कवचकुंडल अभियान यशस्वी करूया ; तहसीलदार खालापूर

। रसायनी । वार्ताहर ।
कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि सर्व जनतेच्या भल्यासाठी कवचकुंडल तयार करूया,असे आवाहन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित खास बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शासनाने 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या काळावधीत कोविड-19 लसीकरणसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून याकाळात लसीकरणाचे डोस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. या आठवड्यात लस घेण्यापासून कोणीही वंचित रहाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विस्तार अधिकारी यांची खास बैठक खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती.


याप्रसंगी 11 ऑक्टोबर रोजी खास महिलांसाठी लसीकरण करण्यात येणार असून ही मोहीम यशस्वी करा, असे आवाहन गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी केले असून उपसभापती विश्‍वनाथ पाटील यांनी आदिवासी भागात जनजागृती करण्याची गरज प्रतिपादित केली. तर उपसभापती विश्‍वनाथ पाटील यांच्या माध्यमातून माडप भागात आदिवासी लसीकरण पूर्ण होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव यांनी सांगितले.

Exit mobile version