लहान मुलांमधला कोविड रोखूया -जिल्हाधिकारी


जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेबिनार संपन्न
अलिबाग | वार्ताहर |
लहान मुलांमधला कोविड आजार जिल्हयात येऊ नये, याकरीता कोविड स्वयंसेवकाबरोबरच आई- वडिलांची भूमिकाही महत्वाची आहे. ही तिसरी लाट जिल्हयात येणार नाही, सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.


रायगडात लहान मुलांना कोरोना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र नागरिकांनी आणि पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याकरिता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संस्था, संघटनांनीही प्रबोधन करावे,
जिल्हाधिकारी निधी चौधरी

लहान मुलांमधला कोविड-आम्हाला हे माहिती पाहिजे या वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. हा वेबिनार रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व स्वदेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

जिल्हयातील विविध संस्था-संघटनांचे 240 स्वयंसेवक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आलेल्या रायगड कोविड हेल्पलाईन मध्ये कार्यरत आहेत. या स्वयंसेवकांसाठी रायगड जिल्हयातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ व इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या राष्ट्रीय संस्थेचे माजी उपाध्यक्ष डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांचे मार्गदर्शन दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हाधिकारी निधी चौधरी होत्या. डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांच्याबरोबर संवादक म्हणून पोलादपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश शिंदे होते. सर्वांचे स्वागत स्वदेस फाऊंडेशनचे तुषार इनामदार यांनी केले.

या वेळी डॉ.दाभाडकर यांनी लहान मुलांतील कोविड व्याप्ती, गांभीर्य, तिसरी लाट व मुले कोविडग्रस्त मुलांची तसेच मुलामध्ये हा आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रतिबंधक उपाय, कुपोषण व कोविड चौरस आहार व कुपोषणाचा जटील प्रश्‍न, स्तनदा व गर्भवती माता यांनी घ्यावयाची काळजी व त्यांच्यातील लसीकरण, सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी या अनेक विषयावर समुपदेशनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

लहान मुलांना औषधे देताना, तपासण्या करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवूनच औषधे द्या, स्टिरॉईडसारखी इतर औषधे मनानेच देऊ नका. औषधापेक्षा सकस व चौरस आहाराकडे लक्ष द्या अशा अनेक मुद्यांना स्पर्श केला.कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, समाज माध्यमातून येणार्‍या उपचारावर, अफवांवर विश्‍वास ठेवू नये व या कठीण काळात शासन, प्रशासन, पोलीस व डॉक्टर्स यांना सहकार्य करावे, असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना पांडे यांनी केले तर उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी आभार मानले. अनेक कार्यकर्त्यांनी डॉ. दाभाडकर यांनी अत्यंत अवघड विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल व समुपदेशनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Exit mobile version