ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे कार्य उल्लेखनीय: शैलाताई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा ग्रंथालय संघामार्फत गेली 32 वर्षे ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग यशस्वीपणे चालविला जात आहे. या वर्गाद्वारे जिल्ह्यातील बहुसंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्हा ग्रंथालय संघ गौरवास पात्र असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागच्या कार्याध्यक्ष आणि जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्ष शैला पाटील यांनी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग यांचे विद्यमाने चालविण्यात येणार्‍या ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केले.

गेली 32 वर्षे जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग रायगड जिल्हा ग्रंथालय संघामार्फत चालविण्यात येत आहे. या वर्षीचा या वर्गाचा शुभारंभ बुधवारी सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग डोंगरे हॉल येथे करण्यात आला. दोन महिने हा वर्ग जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे चालविण्यात येणार आहे.

कार्यक्रमास संजय बोंदार्डे यांनी ग्रंथालय संघाचे यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि या वर्गास शुभेच्छा दिल्या. यावेळी भालचंद्र वर्तक, सुबोध डहाके, आशिष पारसनीस, गौरी जगे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाचा ग्रंथचित्र पुरस्कार प्राप्त श्री. नागेश कुळकर्णी यांना रायगड प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शैला पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक नागेश कुळकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास प्रकाश पाटील, संजय खांबेेटे, जिजा घरत, सार्वजनिक वाचनालय नवीन राऊत, अभिजीत चौधरी तसेच जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version