बहिणीचा खून केल्याप्रकरणी बहिणीसह तिच्या पतीस जन्मठेप

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

| माणगाव | प्रतिनिधी |

सख्ख्या बहिणीचा खून केल्याप्रकरणी बहीण व तिच्या पतीस न्यायालयाने दोषी धरले असून, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माणगाव सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, सदर खटल्यातील मयत अरूणा विठोबा उभारे या प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे आरोग्य सेविका म्हणून कामात होत्या. त्यांचा घटस्फोट झाल्याने त्या रवाळजे येथे एकट्याच राहात होत्या. मयत या त्यांची आरोपी बहीण सुरेखा व तिचे आरोपी पती रमेश मेंगडे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकरिता व घर खर्चाकरिता नेहमी आर्थिक मदत करत असत. त्यांना कामानिमित्ता बाहेरगावी जायचे असल्याचे मयत या स्वतःचे दागिने हे आरोपींकडे सांभाळण्याकरीता ठेवत असत. हा गुन्हा घडण्यापूर्वी 2018 मध्ये मयत या चारधाम यात्रेस जात असताना आपले सोन्याचे दागिने व रोख रक्कम आरोपींना सांभाळण्याकरीता दिली होती. त्यानंतर आरोपींनी मृत अरूणा विठोबा उभारे हिने दुसरे लग्न केल्यास सर्व संपत्तीवरचा आपला हक्क निघून जाईल म्हणून तिला जिवे ठार मारण्याचा कट रचला.

मयत ही चारधाम यात्रेहून परत आल्यानंतर दि. 29 मे 2018 रोजी रात्रीच्या वेळी आरोपींनी संगनमत करून मयताच्या घरात प्रवेश करून हातपाय बांधून, ब्लाऊजने गळा आवळून सोन्याचे दागिने व कपाटातील रोख रक्कम जबरीने चोरली. याबाबत आरोपी रमेश मेंगडे याने स्वतः माणगाव पोलीस ठाणे येथे जाऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास माणगाव पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा हे करत असताना आरोपी रमेश मेंगडे व सुरेखा मेंगडे यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सदर गुन्हा हा त्यांनीच केला असल्याचे कबूल करून गुन्ह्यातील चोरीचे दागिने व रोख रक्कम आरोपींनी काढून दिली.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांनी केला व सदरचे दोषारोप पत्र मा. जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. या खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायालय, माणगाव-रायगड येथे झाली. सदर खटल्यामध्ये जितेंद्र डी. म्हात्रे अति. शासकीय अभियोक्ता, यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. या केसच्या सुनावणी दरम्यान तत्कालीन पैरवी अधिकारी यू.एल. घुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक, पैरवी अधिकारी अनंत पवार, पोलीस उपनिरीक्षक, छाया कोपनर मपोह, शशिकांत कासार, पोह व शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी आरोपींना दि. 07 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Exit mobile version