10 कुटुंबीयांचे अद्याप पुनर्वसन नाही
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडकामाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेटच्या दिशेला पादचारी पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीजवळील सुंदर नगरमधील एकूण 18 झोपडपट्ट्या हटविण्यात आल्या असून, पादचारी पूलाचे काम अंतिम टप्यात आहे. मात्र, रहिवाशांचे पुनर्वसन रखडल्याने रहिवाशांनी संसार रस्त्यावर मांडला आहे. 1985 पासून आम्ही येथे राहत आहोत. रेल्वेने घरे तोडल्याने आम्ही ताडपत्रीत राहत आहोत. झोपड्या तोडल्या, तरी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात हाल होत आहेत. मुले शाळेत आहेत, त्यांनाही अभ्यास करण्यास अडचण येत आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यायला हवी, अशी विनंती स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
परळ येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीजवळच्या सुंदर नगर चाळीतील रहिवासी सुमारे 50 ते 60 वर्षांपासून राहात आहेत. या ठिकाणी 18 झोपड्या होत्या. गतवर्षी 25 जून रोजी परळ रेल्वे प्रशासनामार्फत या झोपड्या हटवण्यात आल्या. त्यातील केवळ आठ रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे; परंतु, 10 कुटुंबीयांचे अद्याप पुनर्वसन झाले नसल्याने ते रस्त्यालगत ताडपत्री बांधून राहत आहेत. त्यांनाही रेल्वे प्रशासनामार्फत वारंवार हटविण्यात येत आहे. मुलांच्या ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर कारवाई केली जाणार होती; परंतु, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन दिले. त्यांनी रहिवाशांचे पुर्नवसन होईपर्यंत कारवाई करू नका, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्याचे रहिवाशांनी सांगितले. तसेच, अनेकांचे परळ सिग्नलजवळ लहान मोठे व्यवसाय आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. एकीकडे बेघर झाले असताना आम्हाला व्यवसायही करू दिला जात नसल्याची उद्विग्नता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
पाण्यासाठी पायपीट
परळ रेल्वेप्रशासनाकडून गतवर्षी येथील झोपड्या तोडण्यात आल्या. त्यामुळे रहिवशांना रस्त्यावर रहावे लागत आहे. त्यांना पिण्यासाठी दोन हंडे पाणी जवळपासच्या इमारती किंवा चाळीतून आणावे लागत आहे. तसेच, आठवड्यातून एकदा सर्व मिळून पैसे काढतात आणि पाण्याच्या टँकरची सोय करतात.
विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी एल्फिन्स्टन रेल्वे पूल पाडल्यामुळे त्याखाली व्यवसाय करणाऱ्या 100हून अधिक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही जगायचे कसे, असा सवाल या विक्रेत्यांकडून विचारला जात आहे.







