। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील तरुण नेहमीप्रमाणे दरीमध्ये उतरून प्रवास करीत असताना पाय घसरून अपघात झाला. त्या अपघातानंतर माथेरानमधील पोलिसांनी सह्याद्री रेस्न्यु टीमला पाचारण केले. त्यानंतर पोलीस कर्मचारी, रेसक्यू टीम आणि स्थानिक आदिवासी तरुणांनी त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले आहे. दरम्यान, भूषण भानुदास शिंदे या तरुणाला गंभीर जखमा झाल्या असून त्याला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
माथेरान शहरातील बाजारपेठ येथे आईसगोळा बनवून विकण्याचा व्यवसाय करणारा भूषण भानुदास शिंदे तरुण अनेकदा माधवजी पॉइंट येथील बाबा हाऊस येथून उतरून दरीमधून खंडाळा पॉईंट असा प्रवास करीत असतो. रविवार (दि.19) मे रोजी साधारण पाच वाजता त्या प्रवासात त्याचा पाय घसरला आणि आणखी खोल दरीत कोसळला. त्याबद्दल माहिती मिळताच माथेरान पोलीसांनी सह्याद्री रिस्न्यू टीम यांना मदतीसाठी बोलावून घेतले.
सायंकाळी साडेसात वाजता अथक प्रयत्नांनी दरीमध्ये पडलेल्या भूषण शिंदे याला बाहेर काढण्यात रेसक्यु टीमला यश मिळाले. तसेच, आदिवासी तरुणांची मोठी मदत रेस्न्यु टीम आणि पोलिसांना झाली. दरी मधून बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ जखमी तरुणाला भूषण शिंदेला माथेरान येथील बीजे रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.






