रोहा मोरेआळी-हनुमान टेकडी-तांबडी मार्गाची दुरवस्था
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा शहरातील मोरेआळी येथून हनुमान टेकडी मार्गे तांबडीकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत खड्डेमय आणि धोकादायक बनला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी वाहून गेल्या असून, ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. परिणामी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या मार्गावर यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तांबडी परिसरात बाहेरगावाहून पर्यटकांची ये-जा सुरू असते. मात्र, खराब रस्त्यामुळे पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून, परिसराच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक बिलाल अकबर मोर्बेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोहा कार्यालयात निवेदन देऊन सदर रस्ता साईडपट्टीसह नव्याने करण्याची मागणी केली आहे. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून तक्रारी नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, रस्त्याची दयनीय अवस्था दर्शविणारे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा येथील उपअभियंता बागुल यांनी सांगितले की, संबंधित रस्त्याच्या कामाचा समावेश चालू अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. त्याआधी रस्त्यालगत असलेल्या झाडे-झुडपांच्या कटिंगचे काम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूणच, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोरेआळीहनुमान टेकडीतांबडी मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी देण्याची गरज व्यक्त होत आहे.







