| सुधागड-पाली | वार्ताहर |
अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण पूर्ण झालेल्या वाकण-खोपोली राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात आदळून अनेक अपघात होत आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचा संताप आता अनावर झाला आहे.
वाकण-खोपोली हा राज्य महामार्ग 39 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याचे काम 2016 पासून शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आणि दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, इतके वर्षे काम सुरु असलेल्या या मार्गाच्या कामाच्या दर्जाच्या बाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केला आहे. शासनाकडून सुमारे 200 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी व नागरिक संतप्त आहेत. या मार्गावरील खड्डे योग्य प्रकारे भरण्यासाठी स्थानिकांनी मागील दोन महिन्यात दोन वेळा आंदोलन केले. खड्ड्यामंध्ये झाडे लावून तसेच फलक दाखवून हे आंदोलन करण्यात आले. मात्र, अजुनपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मागील आठवड्यात तुकसई गावाजवळील खड्ड्यात दुचाकी आपटून एक तरुण गंभीर जखमी झाला होता.
एमएसआरडीसी अजून किती अपघातांची वाट बघणार आहे. रस्त्याची दुरवस्था व खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. अनेकांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. या रस्त्याची लवकर लवकर दुरुस्ती करून खड्डे चांगल्या प्रकारे भरण्यात यावेत. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल.
सुनील साठे,
मनसे अध्यक्ष, सुधागड तालुका







