मोहोपाडा प्रवेशद्वारावरचा जीवघेणा उतार

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

| रसायनी | वार्ताहर |

दांड रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा प्रवेशद्वारालगतच्या उतारावरील रस्तावर खडी व दगड वर आल्याने रोजच किरकोळ अपघात होत आहेत. शिवाय रस्त्याला मोठंमोठे खड्डे देखील पडले आहेत. या रस्त्यावरुन रसायनी-पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे वाहनांची रोजची रेलचेल असल्याने मोठ्या अपघातांची शक्यता प्रवासी वर्गाकडून वर्तविली जात आहे.

दांड-रसायनी रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, वर्षभरातच मोहोपाडा प्रवेशद्वरासमोर रस्त्याचा उताराला निकृष्ट डांबरीकरण झाल्याने येथील खडी बाहेर आली आहे. शिवाय उतारावरच वळण असल्याने या रस्त्यावर अपघात होऊन वाहनचालकांना जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच या ठिकाणी रोजच दुचाकी घसरुन अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याकडे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांकडून बोलले जात आहे. तसेच, या उतारावर मोठा अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील प्रवासी व नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version