अखेरच्या सामन्यातही जादू कायम; अर्जेंटिनाचा बेनिनवर 3-0 विजय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
फुटबॉलच्या मैदानावर तब्बल दोन दशके आपल्या जादुई खेळाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लिओनेल मेसीने अर्जेटिनाच्या जर्सीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना अविस्मरणीय ठरवला. मॉन्युमेंटल स्टेडियमवर बेनिनविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाने 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि मेस्सीला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा विजयी निरोप दिला.
अखेरच्या सामन्यातही मेस्सीची जादू कायम राहिली. त्याने दोन गोलांसाठी असिस्ट केली, तर 71 व्या मिनिटाला पेनल्टीवर स्वतः गोल झळकावत चाहत्यांना अखेरची अविस्मरणीय भेट दिली. मेस्सीच्या निरोपाच्या सामन्यामुळे मॉन्युमेंटल स्टेडियम भावनांनी ओथंबून गेले होते. स्टेडियमकडे जात असतानाच मेस्सी भावुक झाला. डोळ्यांत तरळणारे अश्रू आणि चेहऱ्यावर असलेले भाव पाहून चाहत्यांनाही आपल्या लाडक्या तारकाच्या निरोपाची जाणीव झाली. सामन्यापूर्वी रिव्हर प्लेटने मेस्सीचा विशेष सन्मान केला. त्याला मानद सदस्यत्व, स्मृतिफलक आणि त्याच्या नावाची विशेष जर्सी प्रदान करण्यात आली. बेनिनच्या खेळाडूंनीही मैदानात मेसीचा सन्मान केला. हा मेस्सीचा अर्जेंटिनाकडून 208 वा आणि अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. सुरुवातीपासूनच अर्जेटिना आक्रमक खेळ करत बेनिनवर दबाव निर्माण केला. 48 व्या मिनिटाला मेस्सीने मारलेल्या अचूक कॉर्नरव निकोलस ओटामेंडीने गोल करत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
61 व्या मिनिटाला निको पाझने अप्रतिम फिनिशिंग करत आघाडी 2-0 केली. त्यानंतर 71 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. संपूर्ण स्टेडियमच्या नजरा मेस्सीकडे खिळल्या होत्या. आपल्या कारकीर्दीत असंख्य वेळा अशा क्षणी संघाची जबाबदारी पेललेल्या मेस्सीने यावेळीही चूक केली नाही. त्याने चेंडू गोलरक्षकाच्या आवाक्याबाहेर टॉप राइट कॉर्नरमध्ये धाडला आणि अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या नावावर गोलाची नोंद केली.
अर्जेटिनाने अखेर 3-0 असा विजय मिळवला. निकाल अर्जेटिनाच्या बाजूने लागला. मात्र, या रात्रीचा खरा नायक होता तो मेस्सीचा निरोप. ज्या खेळाडूने अर्जेटिनाला विश्वविजेतेपदाचा मान मिळवून दिला, असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आणि पिढ्यान्पिढ्यांच्या चाहत्यांना फुटबॉलची नवी भाषा शिकवली, त्याने अखेर राष्ट्रीय संघाच्या जर्सीला निरोप दिला. मैदानातून मेस्सीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली, पण त्याची जादू, त्याच्या गोलांच्या आठवणी आणि चाहत्यांच्या मनातील ममेस्सीफ मात्र कधीच संपणार नाही, एवढे नक्कीच.
मॉन्युमेंटल स्टेडियममध्ये जल्लोष
मेस्सीच्या या गोलानंतर मॉन्युमेंटल स्टेडियममध्ये जल्लोष आणि भावुकता एकाच वेळी दाटून आली. चाहत्यांसाठी हा केवळ एक गोल नव्हता, तर आपल्या आवडत्या फुटबॉलपटूच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटच्या अध्यायावर उमटलेली अविस्मरणीय स्वाक्षरी होती.
