। अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।
खोपोली आणि खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सापांविषयी जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम सर्पमित्र करताना सुरक्षितपणे साप पकडून सुरक्षित वनक्षेत्रात सोडत असतात. सर्पमित्रांच्या जागरुकतेमुळे तालुक्यातील उच्चभ्रू वस्तीतच नव्हे तर आदिवासी वाड्या पाड्यात देखील साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना आवर्जून कॉल दिला जातो. सर्पमित्रांच्या या कामगिरीला सहकार्य करण्याचे हेतूने लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरक्षीतपणे साप हाताळणी करण्यासाठी साधने उपलब्ध करुन दिली.
आंतरराष्ट्रीय सर्प दंश जागरूकता दीन, दक्षिण भारतीयांचा ओणम सण त्याच सोबत जेष्ठ सर्पमित्र नवीन मोरे आणि सुनील पुरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्प हाताळणीसाठीच्या साधनांचे वितरण केले गेले. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्या सर्वांचे कौतुक करत त्यांच्या कामगिरीसाठी शिल्पा मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
खोपोली शहरातील रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा उपक्रम संपन्न झाला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे सदस्य तथा पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते.







