लहानांपासून थोरांपर्यंत मनोरंजनाची पर्वणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-मांडवा मार्गावरील कनकेश्वर फाटा येथे लायन्स क्लब ऑफ अलिबाग-मांडवा यांच्यावतीने लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 8 ते 12 जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत रंगणार असून, स्थानिकांसह पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. यामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने आणि मुलांसाठी खास अम्युझमेंट पार्कचा समावेश आहे. विशेष म्हणजे आर. डी. सागवेकर ज्वेलर्स यांच्या सौजन्याने महोत्सवात दररोज लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले आहे. महोत्सवाचा शुभारंभ 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर रात्री साडेसात वाजता शालेय नृत्य स्पर्धा पार पडणार आहेत. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मराठमोळी झेड-फ्युजन आणि रात्री साडेसात वाजता दर्याभवानी हे ऐतिहासिक नाट्य सादर केले जाणार आहे. 10 जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता शिवकालीन परंपरा हा आधुनिक फॅशनच्या जगातील मराठी संस्कृती जपणारा सोहळा रंगणार असून, याचे कोरिओग्राफर अशमीक कामठे आहेत. 11 जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता ‘लायन्स मांडवा श्री 2026′ ही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार आहे. महोत्सवाचा समारोप 12 जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता ‘हेअर अँड ब्युटी ईल्युजन 2026′ या सौंदर्य स्पर्धेने होणार आहे. या संपूर्ण उपक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत बोरीस-गुंजीस आणि अनुप मेहता अँड ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महोत्सवाचे नेटके नियोजन फेस्टिवल अध्यक्ष नितीन अधिकारी आणि समन्वयक एमजेएफ अमिष शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फेस्टिवल कमिटीद्वारे करण्यात येत आहे. या कमिटीमध्ये समन्वयक म्हणून प्रथम उप जिल्हा प्रांतपाल पीएमजेएफ प्रवीण सरनाईक, मुख्य समन्वयक माजी जिल्हा प्रांतपाल पीएमजेएफ अनिल जाधव, उपाध्यक्ष अभिजीत गुरव, सचिव धवल राऊत, खजिनदार सुधीर पुरो, क्लबचे अध्यक्ष ऋग्वेद ठाकूर, प्रथम उपाध्यक्ष हर्षद पाटील, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, झोन चेअरपर्सन डॉ. रेखा म्हात्रे आणि एलसीआयएफ समन्वयक एमजेएफ अरविंद घरत या अनुभवी टीमचा समावेश असून त्यांच्या देखरेखीखाली महोत्सवाची तयारी सुरू आहे.







