‘या’ कालावधीत लायन्स किहीम फेस्टिव्हलचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब मांडवा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. याच सामाजिक दायित्वाच भाग म्हणून आणि विविध उद्योजक व ग्राहक वर्ग यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा या उद्देशाने 3 ते 6 जानेवारी या कालावधीत राजा शिवछत्रपती क्रीडांगण, किहीम येथे चार दिवसीय लायन्स किहीम फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे 100 स्टॉल्स फेस्टिव्हलप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असणार आहेत.

लायन्स किहीम फेस्टिव्हलमधून संकलित होणार निधी सोगाव येथे बांधल्या जात असलेल्या अकरा गुंठे जागेतील सहा मजली ‘लायन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी आणि चोंढी येथील लायन्स पॅथॉलॉजी लॅबसाठी वापरला जाणार आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन शुक्रवार, 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच सोमवार, 6 जानेवारी रोजी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये खवय्यांसाठी मटण, चिकन, मच्छी, तसेच मोदक, पुरणपोळी आदींचे फूड स्टॉल्स असून इतर स्टाल्समध्ये विविध प्रकाची उत्पादने, साडी, ड्रेसमटेरियल, वेगवेळ्याप्रकारची भांडी, शेतकर्यांसाठी खास कृषी विषयक नवनवीन औजारे व उत्पादने, चायनीज बोकड, बच्चेकंपनीसाठी अम्युसमेंट पार्क, बँकांचे स्टॉल्स, चारचाकी गाड्यांचे प्रदर्शन आदी असणार आहे. तसेच लायन्स मांडवा श्री शरीरसौष्टव स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा, लायन सुंदरी सौंदर्य स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार, तरुणाईसह सर्व वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारी मराठी पाऊल पडते पुढे ही संगीतरजनी असे एकाहून एक सरस कार्यक्रम आणि धम्माल मस्ती या फेस्टिव्हलमध्ये अनुभवता येणार आहे.

या फेस्टिव्हलचे चेअरमन मोहन पाटील असून नियोजन समितीत लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, अमिष शिरगावकर, अरविंद घरत, धवल राऊत, हर्षद पाटील, सुबोध राऊत, अभिजीत गुरव, प्रदीप पाटील, विद्या अधिकारी, मृदुला राऊत, सारिका पाटील आणि लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर आदी पदाधिकारी, सदस्य आहेत.

Exit mobile version