। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसमोर असलेल्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी हे मैदान मद्यपींचा अड्डा बनला असल्याचे दिसून येत आहे.
तळा शहरातील मराठी शाळेसमोर असलेल्या गोपीनाथ वेदक मैदानावर शाळेतील विद्यार्थी नेहमी खेळाचा सराव करत असतात. हिवाळी क्रीडा स्पर्धा जवळ आल्याने या मैदानावर नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. गुरूवारी सकाळी विद्यार्थी व शिक्षक वर्ग शाळेत येत असताना त्यांना शाळेसमोरच मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या व काही फुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. हे दृश्य पाहून शिक्षक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अविचारी मद्यपींकडून ज्ञानाचे प्रसार करणार्या शाळा परिसरात मद्यप्राशन केले जात असल्याने पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून अशा मद्यपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.