राज्य उत्पादन शुल्क विभागासह रायगड पोलीसांच दुर्लक्ष
| अलिबाग | प्रमोद जाधव |
चमचमीत खाद्य पदार्थाचे आस्वाद घेण्यासाठी गावोगावी तयार झालेल्या चायनीजच्या दुकानात खुलेआमपणे दारु विक्री व दारु पिणाऱ्यांचे अड्डे बनू लागले आहेत. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याने या अवैध धंद्यांना प्रचंड ऊत येऊ लागला आहे.
सर्वसामान्यांना मोठ्या हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थ खाणे परवडत नसल्याने गरीबांचे हॉटेल म्हणून शहरी व ग्रामीण भागात चायनीजचे दुकान गेल्या दहा वर्षापुर्वी सुरु झाले. या चायनीजच्या दुकानात संध्याकाळनंतर काहीजण मित्रमंडळींसमवेत व काही जण कुटुंबियांसमवेत येऊ लागले. वेगवेगळे मांसाहारी, शाकाहारी पदार्थ खाण्याचा आनंद अनेकजण घेऊन लागले. महिला वर्गदेखील आपल्या कुटुंबियांसमवेत या दुकानांमध्ये चायनीज पदार्थ खाण्यासाठी येत असत. चायनीजच्या दुकानांमध्ये गर्दी वाढल्याने हा व्यवसाय वृंध्दीगत होऊ लागला. गावागावात नाक्यावर ही दुकाने सुरु झाली. या व्यवसायातून स्थानिकांना चांगला रोजगार मिळू लागला.
सुरुवातीला या दुकानांमध्ये दारु पिण्यास बंदी होती. काहीजण बाहेरून दारु आणून दुकानात लपून दारु पिऊन चायनीज पदार्थांचा आस्वाद घेऊ लागले. परंतू याकडे पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या दुकानांमध्ये खुलेआमपणे दारु विक्री व दारु पिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. या दुकानांमध्ये दारु पिऊन चायनीज पदार्थ खाण्याची क्रेझ वाढू लागली. मात्र गेल्या काही वर्षापासून या दुकानांमध्ये खुलेआमपणे दारु विक्रीपासून दारु पिण्याची व्यवस्था केली जात आहे. पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धाक कमी झाल्याने काही मंडळी बिधानस्तपणे या दुकानांमध्ये दारु पिण्यापासून दारु विक्री करण्याचे प्रकार करीत आहेत. दारु पिणाऱ्यांची संख्या वाढल्याने या दुकानाला दारु पिणाऱ्यांचा अड्डा म्हणून समजला जात आहे. त्याचा परिणाम तरुणाई दारुच्या आहारी जाण्याची संख्या वाढण्याचा धोका वाढू लागला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या या दुकानांमुळे काही जण दारु पिऊन वाहने चालवित असतात. त्यामुळे अपघातची भिती देखील निर्माण झाली आहे.
चायनीजच्या दुकानांमध्ये खुलेआमपणे दारू विक्री, दारु पिण्याचे प्रकार घडत असल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक पोलीसांना दिल्या जातील.
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
चायनीज दुकानांमध्ये बेकायदेशीर दारु विक्री, पिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम कडक केली जाईल. यापुर्वी देखील कारवाई केली आहे. परंतू या दुकानांमध्ये दारु विक्री, पिणाऱ्यांवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड